कलावंत व साहित्यिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री ज्ञान सरस्वती मंदिराचा कलशारोहण सोहळा
कलावंत व साहित्यिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री ज्ञान सरस्वती मंदिराचा कलशारोहण सोहळा

————————————-
मूर्ती प्राणप्रतिष्ठा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या हस्ते संपन्न झाली होती आणि आता कलशारोहण त्यांच्याच पटशिष्या विदुषी विद्याताई भागवत यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
——————————–
किशोरीताई रचला पाया विद्याताई झालीयासे कळस… असा दुर्मिळ योग

——————————–
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारे सर्व कलावंतांचे व साहित्यिकांचे आराध्य दैवत श्री ज्ञान सरस्वती मंदिर लातूर या ठिकाणी दिनांक 13 मे 2025 रोजी गाणं सरस्वती किशोरीताई अमोल कर यांच्या ज्येष्ठ शिष्या श्रीमती विदुषी विद्याताई भागवत यांच्या शुभहस्ते कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे. विशेष म्हणजे या ज्ञान सरस्वती मंदिरातील सरस्वती मातेची प्राणप्रतिष्ठा श्रीक्षेत्र बासर येथील ब्रह्मवृंद व गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या शुभहस्ते व उपस्थितीमध्ये संपन्न झाला होता. दिनांक 13 मे 2025 रोजी श्री ज्ञान सरस्वती मंदिर बार्शी रोड लातूर या ठिकाणी सकाळपासूनच ब्रह्म वृद्धांच्या उपस्थितीत किशोरीताईंच्या ज्येष्ठ शिष्या श्रीमती विदुषी विद्याताई भागवत यांच्या शुभहस्ते कलशारोहण समारंभाला प्रारंभ होईल. याप्रसंगी मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कलावंतांची उपस्थिती असणार आहे. माझे आराध्य माझे गुरु आणि हेच अंतिम सत्य आहे अशी गुरुप्रती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या श्रीमती विदुषी विद्याताई भागवत प्रथमच कलशारोहण सोहळ्यानिमित्त लातूर नगरीमध्ये येत आहेत. साक्षात्कारी सुर आणि एकांतिक लय अशा द्वेतातूनच साधकाला समाधीस्थ अद्वैताची अनुभूती करून देणाऱ्या जयपुर अथ्रोली घराण्याच्या त्या गायिका आहेत. संगीत सम्राट उस्ताद अल्लादिया खान गाणं तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर आणि गानसरस्वती किशोरीताई आमोणकर अशा घवघवीत पिढीजात श्रीमंतीने वाहणाऱ्या प्रतीत यश घराण्याचे ज्ञानतीर्थ प्राशन केलेल्या विदुषी म्हणजे विद्याताई भागवत. श्री ज्ञान सरस्वती मंदिर लातूरच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त श्रीमती विदुषी विद्याताई भागवत यांच्या स्वर्गीय गायनाचा रसास्वाद लातूर तसेच मराठवाड्यातील रसिकांना मिळणार आहे. दिनांक 13 मे 2025 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता श्री ज्ञान सरस्वती मंदिर संस्थान बार्शी रोड लातूर या ठिकाणी श्रीमती विदुषी विद्याताई भागवत यांच्या गान परिमळू
या शास्त्रीय संगीताच्या सुरेल मैफिलीस प्रारंभ होणार आहे. या मैफिलीमध्ये हार्मोनियमची साथ संगत सूरमणी पंडित बाबुराव बोरगावकर, स्वर साथ मधुवंती बोरगावकर तानपुरासात श्री हिमांशू सुबंध व तबला साथ श्री प्रसन्न भुरे यांची असणार आहे. सुरमई पंडित बाबुरावजी बोरगावकर यांच्या अथक परिश्रमातून व सरस्वती मातेवरच्या अत्यंत पराकोटीच्या निष्ठेतून श्री ज्ञान सरस्वती मंदिराची उभारणी झालेली आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बार्शी रोड लगत असणाऱ्या या ज्ञान सरस्वती मंदिराचा परिसर अत्यंत नयनरम्य बनवण्यात आलेला असून 3000 रसिक श्रोत्यांची बैठक व्यवस्था असणारा अप्रतिम सभा मंडप ज्ञान सरस्वती मातेच्या समोर उभारण्यात आलेला आहे. सर्व सुविधांनी युक्त व्यासपीठाची रचना केलेली असून भारतातील कोणीही प्रतिष्ठित अथवा नवखा कलावंत ऐनवेळी त्या ठिकाणी येऊन आपली कला ज्ञान सरस्वती माते समोर सादर करू शकतो अशी व्यवस्था श्री ज्ञान सरस्वती मंदिर संस्थान लातूरच्या वतीने करण्यात आलेली आहे. संपन्न होणाऱ्या कलशारोहण सोहळ्यासाठी व सायंकाळी ठीक सहा वाजता संपन्न होणाऱ्या श्रीमती विदुषी विद्याताई भागवत यांच्या गानपरीमळू या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थांच्या वतीने तालमणी डॉ. राम बोरगावकर व सूरमणी पंडीत बाबुराव बोरगावकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
