Wednesday, September 10, 2025
ताज्या घडामोडी

लोखंडी सावरगाव ते बर्दापूर महामार्गाचे होणार चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश  *वार्षिक आराखड्यात समावेश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली वचनपूर्ती*

लोखंडी सावरगाव ते बर्दापूर महामार्गाचे होणार चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश 

*वार्षिक आराखड्यात समावेश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली वचनपूर्ती*

अंबाजोगाई : शहराजवळून जाणारा ५४८ बी हा महामार्गावरील बर्दापूर ते लोखंडी सावरगाव या टप्प्याचे चौपदरीकरण करण्याचे आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारसभेत दिलेले वचन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या वार्षिक आराखड्यात या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे.

अंबाजोगाई आणि लातूरला जोडणाऱ्या ५४८ बी या महामार्गावर बर्दापूरच्या पुढे येताच चार पदरी रस्त्याचे अचानक दोन पदरीत रूपांतर होते. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या गतीचा अचानक अडथळा होत असल्यामुळे याठिकाणी वारंवार गंभीर अपघात घडत आले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव या अपुऱ्या आणि असुरक्षित रस्त्यामुळे गेले आहेत. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात होती.

माजी खासदार प्रीतमताई मुंडे आणि अंबाजोगाईच्या आमदार नमिता मुंदडा यांनी ही नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार मागणी केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान अंबाजोगाई येथे झालेल्या आ. नमिता मुंदडा प्रचारसभेत गडकरी यांनी या प्रकल्पासाठी सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे जाहीर आश्वासन दिले होते.

त्यानंतरही आमदार नमिता मुंदडा यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात गडकरी यांची भेट घेऊन पुन्हा एकदा हा मुद्दा सविस्तर मांडला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांनी २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात लोखंडी सावरगाव ते बर्दापूर या महामार्गाच्या १८ किमी लांबीच्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचा समावेश अधिकृतरीत्या केला आहे. या कामासाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे बर्दापूरच्या पुढे अचानक दोन पदरी होणाऱ्या रस्त्यामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांची साखळी खंडीत होईल. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास अनुभवता येणार आहे. या निर्णयाबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले असून हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयाबद्दल नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याचे काम नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

*मांजरसुंबापर्यंत रस्ता चौपदरीकरणासाठी प्रयत्न सुरू : आ. नमिता मुंदडा*

सध्या दोन पदरी असलेल्या लोखंडी सावरगाव ते मांजरसुंबा या मार्गाचेही चौपदरीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे आ. मुंदडा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!