अंबाजोगाई शहर व परिसरातील धनदांडग्यांच्या बिघडलेल्या व टवाळगिरी करणाऱ्या पोरांवर चाप बसवण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी विशेष मोहीम
अंबाजोगाई शहर व परिसरातील धनदांडग्यांच्या बिघडलेल्या व टवाळगिरी करणाऱ्या पोरांवर चाप बसवण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी विशेष मोहीम

खाजगी सावकारकी करणाऱ्या फायनान्स वरही पोलिसांची करडी नजर
अंबाजोगाई : (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहर व परिसरातील धनदांडग्यांच्या घरातील बिघडलेल्या आणि टवाळगिरी करणाऱ्या पोरांवर चाप बसवण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे दरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरातील खाजगी सावकारकी करणाऱ्या फायनान्स वर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
बीड जिल्ह्यासह अंबाजोगाई शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पदभार घेतल्यापासून विविध प्रकारच्या मोहीम हाती घेतल्या असतानाच आता त्यांनी आपले लक्ष अंबाजोगाई शहरातील धन दांडग्यांच्या घरातील बिघडलेल्या आणि मस्तवाल पणे रस्त्यावर हुल्लडबाजी, टवाळगिरी करणाऱ्या मुलांना आणि त्यांच्या संगतीला लागून बिघडत चाललेल्या युवा पिढीला सरळ करण्यासाठी नवीन मोहीम हाती घेतले असून या मोहिमेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था निश्चितपणे सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अंबाजोगाई शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने एक पत्रक काढून अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आसुन या पत्रका मध्ये त्यांनी शाळा, कॉलेज, बसस्टँड, दुचाकी व चारचाकी परिसरात मुलींच्या गाड्यांच्या पाठीमागे फिरणारे टोळके, रात्री गाड्यांवर केक ठेवून वाढदिवस साजरे करणारे, सायलेंसर मॉडिफाय करून मोठा आवाज करत वाहन चालवणारे तरुण तसेच मोठ्या आवाजात साऊंड लावून गाणी वाजवणारे ऑटोचालक यांच्यावर कारवाईसाठी नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले
पोलिसांनी केलेल्या आवाहना नुसार सार्वजनिक ठिकाणी अराजकता निर्माण करणारे, दारू पिऊन रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे, तसेच आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी, रेणुका माता मंदिर परिसरात किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी अवैध वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. शहरात शिस्त राखण्यासाठी असे प्रकार नागरिकांनी त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी या पत्रकाद्वारे शहर पोलिसांनी नागरिकांना विशेष हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून दिला असून नागरिकांना संशयित व्यक्तींच्या गाड्या अथवा ऑटोचे नंबर प्लेट स्पष्ट दिसतील अशा फोटोंसह तक्रार मोबाईल क्रमांक ९२२५०९२८२३ वर पाठवता येणार आहे. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव व क्रमांक गोपनीय ठेवले जाईल, अशी हमी पोलिस प्रशासनाने दिली आहे.
पोलिस खात्याच्या वतीने नागरिकांना अशा प्रकारच्या गुन्हेगारी व समाजविघातक प्रवृत्तीविरुद्ध तातडीने कारवाई केली जाईल असा विश्वास दिल्याने नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांनी सुरु केलेल्या या विशेष मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
अंबाजोगाई शहरातील खाजगी सावकारकी करणाऱ्या फायनान्स वर पोलिसांची करडी नजर

अंबाजोगाई शहरातील गल्लो गल्ली काही धन दांडग्यांच्या मुलांनी खाजगी सावकारकी करण्यासाठी फायनान्सचा आधार घेतला असून कुठल्याही प्रकारची सहकार खात्याकडे नोंदणी न करणाऱ्या अशा फायनान्स वाल्या मुळे युवा पिढी बरबाद होताना दिसत आहे. सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना पैसे द्यायचे त्याला अवैध धंद्याला प्रवृत्त करायचे आणि अशा मुलांकडून वारे माप व्याजाने पैशाची वसुली करायची अशा प्रकारचा उद्योग शहरातील खाजगी फायनान्स करत असल्याचे आणि त्यामुळेही शहरातील कायदा व सुव्यवस्थेला तडा जात असल्याचे अंबाजोगाई पोलिसांच्या निदर्शनास आल्याने अशा खाजगी सावकारकी करणाऱ्या फायनान्स वर पोलिस करडी नजर ठेऊन आहेत.
Post Views: 2,445