वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडवून शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद
वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडवून शिवीगाळ, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद

अंबाजोगाईः (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी वन बिरगट शिवारात जंगल सफारी स्पॉटची पाहणी करून परतणाऱ्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडवून शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वनपरीमंडळ अधिकारी विजया ग्यानबा शिंगटे (वय ३८, रा. बीड) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी शिंगटे या आपल्या सहकारी वनरक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सरकारी वाहनाने जंगल सफारीच्या जागेची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही पथक परतत असता कुरणवाडी शिवारात सलीम रहिमान चौधरी, सलीम दाऊत चौधरी, इस्माईल गवळी आणि राजा दत्तु कुडंगर यांनी आपली दुचाकी सरकारी वाहनासमोर आडवी लावली.
आमच्या शेतातून गाडी का नेता, असे म्हणत आरोपींनी वनविभागाच्या पथकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी अधिकाऱ्यांनी आपला परिचय देऊनही आरोपींनी वनरक्षक आसाराम बिलपे आणि अब्दुल रन्नू गवळी यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत कर्मचाऱ्याचे शर्ट फाडण्यात आले असून आरोपींनी सर्वांना जीवे मारण्याची धमकी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पो.ह. महेश भागवत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Post Views: 527


