अंबाजोगाई न प च्या उपाध्यक्ष पदी दिनेश भराडिया तर स्वीकृत नगरसेवक पदी राजकिशोर मोदी, बबन भेय्या लोमटे व संजय गंभीरे यांच्या नावाची चर्चा
अंबाजोगाई न प च्या उपाध्यक्ष पदी दिनेश भराडिया तर स्वीकृत नगरसेवक पदी राजकिशोर मोदी, बबन भेय्या लोमटे व संजय गंभीरे यांच्या नावाची चर्चा

‘पक्षांतर बंदी’ कायद्यामुळे घोडेबाजाराला बसणार लगाम? गद्दारी केल्यास नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार
अंबाजोगाई:
अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी दिनेश भराडिया तर स्वीकृत नगरसेवक पदी राजकिशोर मोदी, बबन भेय्या लोमटे आणि संजय गंभीरे यांची निवड होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आसुन ‘पक्षांतर बंदी’ कायद्यामुळे घोडेबाजाराला बसणार लगाम बसून गद्दारी करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.
उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत असून गुरुवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून सत्तेची गणिते जुळवण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीत पक्षांतर बंदी कायद्याचा मोठा अडथळा असल्याने चर्चेत असलेल्या ‘घोडेबाजाराला’ लगाम बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेत एकूण ३१ नगरसेवक असून बहुमतासाठी १६ मतांची आवश्यकता आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी नंदकिशोर मुंदडा निवडून आले आहेत. त्यांच्या शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडे ११ नगरसेवक आहेत, तर राजकिशोर मोदी यांच्या लोकविकास महाआघाडीकडे २० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. संख्याबळाचा विचार करता उपनगराध्यक्ष पदावर मोदी गटाचे वर्चस्व स्पष्ट दिसत असले तरी, राजकीय फोडाफोडीच्या चर्चेने निवडणुकीत रंगत भरली आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी लोकविकास महा आघाडी अर्थात मोदी गटाकडून स्वतः राजकिशोर मोदी, बबनराव लोमटे यांची नावे चर्चेत आहेत तर जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते व नगराध्यक्ष नंदकिशोरजी मुंदडा मुंदडा यांच्याकडून मुस्लिम समाजाला खुश ठेवण्या साठी शेख रहीम यांचे नांव राहील अशी चर्चा असताना काल रात्री पासून संजय गंभिरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
संख्याबळानुसार मोदी गटाला दोन तर मुंदडा गटाला एक स्वीकृत नगरसेवक मिळणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीसाठी हात उंचावून उघड मतदान होणार असल्याने फुटणाऱ्या नगरसेवका समोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे त्यामुळे प्रत्येक नगरसेवकांच्या हालचालीवर आघाडीचे लक्ष आहे.
नगर पालिकेत अंबाजोगाईत मोदी गटाचे २० नगरसेवक असल्याने मोदी गटाला 2 स्वीकृत नगरसेवका सह उपाध्यक्ष आणि 5 पैकी 4 विषय समित्यासुद्धा मोदी गटालाच मिळु शकतात.
या संपूर्ण प्रक्रियेत ‘महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६’ हा कायदा कळीचा ठरणार आहे. या कायद्यानुसार, जर एखाद्या नगरसेवकाने आपल्या आघाडीचा ‘विप’ (आदेश) डावलून मतदान केले, तर त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. तसेच, या पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र लोकप्रतिनिधीला यापुढे सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही असा नियम आहे.
अपात्रतेपासून वाचण्यासाठी किमान दोन-तृतीयांश नगरसेवकांनी एकत्र गट बदलणे आवश्यक आहे. त्यातील किमान 5 नगरसेवकांचा गट फुटणे तांत्रिकदृष्ट्या कठीण मानले जात आहे. या कायद्यामुळे नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असून जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतचे अधिकार असल्याने बंडखोरी करणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे कायदेशीर पेच टाळून कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 2,331


