*खिलाडू वृत्तीने चांगला समाज व निकोप राष्ट्रनिर्मिती होते – राजकिशोर मोदी* *अंबाजोगाईत २०२७ मध्ये भव्य आयपीएल फॅन पार्क उभारण्याचा मानस – अक्षय मुंदडा* *खेळामुळे सांघिक भावना टिकून राहते – पोलीस निरीक्षक शरद जोगदंड* *निरोगी शरीर हे निरोगी मनाचे प्रतीक – डॉ राजेश इंगोले*
*खिलाडू वृत्तीने चांगला समाज व निकोप राष्ट्रनिर्मिती होते – राजकिशोर मोदी*
*अंबाजोगाईत २०२७ मध्ये भव्य आयपीएल फॅन पार्क उभारण्याचा मानस – अक्षय मुंदडा*
*खेळामुळे सांघिक भावना टिकून राहते – पोलीस निरीक्षक शरद जोगदंड*
*निरोगी शरीर हे निरोगी मनाचे प्रतीक – डॉ राजेश इंगोले*

======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्व.प्रकाशचंद मुथा यांच्या स्मरणार्थ अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अंबाजोगाई शहरातील क्रीडाप्रेमी, खेळाडू, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रीडा संस्कृतीचा प्रसार आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे राजकिशोर मोदी यांनी खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात मुलांना मैदानावर खेळण्यासाठी प्रवृत्त करणे ही काळाची गरज बनली आहे. अंबाजोगाई शहरातील मुलांना मैदानावर आणून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे आणि राज्यस्तरावर नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मोहित परमार आणि त्यांच्या सहकारी माही परमार करत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक लहान खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो जीवनाचा अविभाज्य घटक आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरूस्ती वाढते, मानसिक बळ मिळते आणि जीवनातील यश-अपयश स्वीकारण्याची क्षमता निर्माण होते. क्रिकेट हा खेळ आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून भारतीय खेळाडूंनी जगभरात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंबाजोगाई सारख्या शहरातूनही भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला चांगला नागरिक आणि चांगला माणूस व्हायचे असेल तर आधी चांगला खेळाडू होणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित लहान खेळाडूंना प्रेरणा दिली. त्यांनी स्व.प्रकाशचंद मूथा यांच्या कार्याची आठवण करून देताना सांगितले की, अंबाजोगाई शहरात विविध खेळांसाठी साहित्य सहज उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. शहरातील क्रीडा संस्कृती जपण्यासाठी आणि मुलांना खेळाकडे वळवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात बोलताना अक्षय मुंदडा यांनी अंबाजोगाई शहरासाठी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, येत्या काळात अंबाजोगाई मध्ये आयपीएल फॅन पार्क आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २०२७ मध्ये अंबाजोगाई शहरात जवळपास वीस हजार प्रेक्षक एकत्र येऊन मोठ्या स्क्रीनवर आयपीएल सामने पाहू शकतील असे भव्य फॅन पार्क आयोजित करण्याचा मानस आहे. यामुळे शहरातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलचा थरार एकत्रितपणे अनुभवता येईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे अंबाजोगाई शहराच्या क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळेल तसेच क्रिकेटप्रेमींना मोठ्या प्रमाणावर आनंद घेण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच शहरातील तरूण खेळाडूंनी मेहनत, चिकाटी आणि शिस्त यांचा अवलंब करून आपल्या क्रीडा कारकिर्दीत यश संपादन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी खेळाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, खेळ ही अशी गोष्ट आहे जी समाजात सांघिक भावना टिकवून ठेवते आणि लोकांना एकत्र आणण्याचे काम करते. कोणताही खेळ असो, त्यामधून एकमेकांशी सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होते आणि टीमवर्कची भावना विकसित होते. आजच्या काळात मुले मोबाईल गेम्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतलेली दिसतात, त्यामुळे मैदानावर खेळणाऱ्यांची संख्या कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्यामुळे मुलांना मैदानावर येऊन खेळण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध होते. ते पुढे म्हणाले की, अशाच छोट्या अकॅडमीमधून भविष्यात मोठे खेळाडू तयार होतात. रणजी ट्रॉफी, आयपीएल तसेच अंडर-१४, अंडर-१९ आणि भारतीय संघात खेळणारे अनेक खेळाडू अशाच पायाभूत स्तरावरून पुढे आले आहेत. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विजेत्या संघाचे अभिनंदन करताना त्यांनी पराभूत संघांनी निराश न होता पुढील स्पर्धांमध्ये अधिक मेहनत घेऊन यश संपादन करण्याचा सल्ला दिला. यावेळी आंबजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी अंबाजोगाईतील क्रिकेटच्या इतिहासात मोहित परमार आणी माही परमार यांच्या अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमिने एक नवीन आयाम दिला आहे. मोबाईल व टीव्ही मध्ये मग्न झालेली आजची युवापिढी मैदानावर आणण्यासाठी हा क्रीडामंच उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ.इंगोले यांनी परमार क्रीडा प्रशिक्षक दाम्पत्यांचे आभार मानत निरोगी शरीरात निरोगी मन असणे अत्यावश्यक आहे आणि याद्वारे भारत महासता बनू शकते हा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी जयकुमार लोढा, अक्षय परदेशी यांचे ही समायोचित मार्गदर्शन झाले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षक मोहित परमार यांनी केले तर प्रभावी सुत्रसंचालन अशोक तापडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रभावी शैलीत संपूर्ण कार्यक्रम रंगतदार बनवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्पर्धेचे आयोजक निलेश मुथा यांनी केले. या सन्मान सोहळ्यावेळी राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, नगरसेवक संजय गंभीरे, पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, निलेश मूथा, डॉ.राजेश इंगोले, प्रेमलता मूथा, अशोक तापडे, अनितोष कातकडे, अविनाश साठे, साहेबां लोंढे, जयकुमार लोढा, सतीश बालुतकर, डॉ.संदीप जैन, अक्षय परदेशी, अभिजित जोधळे, सुरज कांबळे, सचिन भिसे, प्रतीक बोथरा, ऋषभ राका आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी, खेळाडू, पालक आणि नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आणि सन्मान सोहळा शहरातील क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यात अशा स्पर्धांमुळे अनेक नवोदित खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
======================
======================


