यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा *स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ख्यातनाम कवी व साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर*
यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईच्या वतीने दिला जाणारा *स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ख्यातनाम कवी व साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर*

अंबाजोगाई – यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा स्व. भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना घोषित करण्यात आला आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आंबेजोगाई येथील राजकारणी, समाजकारण, साहित्य, संस्कृती, संगीत,शिक्षण आदी क्षेत्रात उतुंग कार्य केलेले स्व. भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृतिपित्यर्थ दरवर्षी साहित्य, संगीत, पत्रकारिता, सुसंस्कृत राजकारणी, क्रीडा, सिनेमा – नाट्य, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एका मान्यवरास हा पुरस्कार स्वर्गीय भगवानराव लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जातो यावर्षी हा १४ वा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना दिला जाणार आहे.
मराठी साहित्यविश्वात ग्रामीण जीवनाचे वास्तव, मातीचा सुगंध, शेतकऱ्याच्या घामाची कहाणी, श्रमजीवी माणसाचे दुःख आणि आनंद, तसेच वऱ्हाडी बोलीची अस्सल गोडी आपल्या साहित्यातून प्रभावीपणे व्यक्त करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. लेखक, कादंबरीकार, नाटककार, संशोधक, कोशकार, चित्रकार, काव्यगायक आणि सामाजिक भान असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व त्यांचे आहे. त्यांच्या साहित्याने मराठी ग्रामीण साहित्याला एक वेगळी ओळख आणि नवा आयाम प्राप्त करून दिला आहे. त्यांच्या प्रसिद्ध “काया मातीत मातीत” या काव्यसंग्रहातील शीर्षकातूनच त्यांच्या काव्यविश्वाचे स्वरूप स्पष्ट होते. त्यांनी इंदौर येथे एम. ए. मराठी शिक्षण घेतले व संत गाडगे बाबा विद्यापीठ नागपूर येथून “पारंपरिक वऱ्हाडी म्हणींचा सर्वांगीण अभ्यास” याविषयात पी.एच.डी. प्राप्त झाली.
कपाशीची चंद्रफुले, पाऊसपाणी, गावशिव, पंढरीच्या वाटेवर, काया मातीत मातीत, वैदर्भी, साय, वृषभसूक्त, मातीचा झरतो डोळा,
मायबाप हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. डेबू व डेबूजी प्रमुख कादंबऱ्या आहेत. चित्रपट गीत लेखन, पटकथा लेखन, अंधारयात्रा हे नाटक खूप गाजले होते. पहाडी आवाजात कविता सादर करणारे कवी म्हणून रसिकांना ते आवडतात.
त्यांचा जन्म हिंगणी ता. तेल्हारा जिल्हा अकोला येथे झाला. निवृत्ती नंतर सध्या ते पुण्यात वास्तव्य करतात. त्यांचा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात सुरुवाती पासून सहभाग राहिला आहे. भगवानराव लोमटे व त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. विठ्ठल वाघ यांनी महाराष्ट्रभर कवितेचे कार्यक्रम करून भाषा वृध्दी व प्रसाराचे कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन यावर्षीचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
पुरस्काराचे स्वरुप स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार, रोख पंचवीस हजार रुपये असे आहे.
यापूर्वी हा पुरस्कार, यशवंतराव गडाख पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना. धों. महानोर, रामदास फुटाणे, पं. नाथराव नेरळकर, विजय कोलते, मधुकर भावे, उल्हास दादा पवार, प्राचार्य रा. रं. बोराडे व पद्मश्री डॉ. यु. म. पठाण, प्रा. भास्कर चंदनशिव, पद्मश्री डॉ. सतीश आळेकर व डॉ. वासुदेव मुलाटे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
या वर्षीचा चौदावा पुरस्कार कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना रविवार दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई येथे प्रख्यात साहित्यिक व गांधीवादी विचारवंत प्राचार्य डॉ . विश्वास पाटील, शहादा यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, बीड यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल. अशीही माहिती दगडू लोमटे यांनी दिली. या कार्यक्रमास सर्वां नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन, समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा. सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतीश लोमटे, सदस्य सर्वश्री डॉ. प्रकाश प्रयाग, प्रा. भगवान शिंदे, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, त्र्यंबक पोखरकर आणि राजपाल लोमटे यांनी केले आहे.
Post Views: 204


