दरोडेखोरांचा पोलीस उपायुक्तांच्या छातीवर, तर फौजदाराच्या हातावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरादाखल करण्यात आला गोळीबार
दरोडेखोरांचा पोलीस उपायुक्तांच्या छातीवर, तर फौजदाराच्या हातावर कोयत्याने वार; प्रत्युत्तरादाखल करण्यात आला गोळीबार
पुणे (प्रतिनिधी)
दरोडेखोरांना जेरबंद करायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आसुन बचावासाठी पोलीस उपायुक्तांनी देखील गोळीबार केल्याने एक आरोपी जखमी झाला आहे. या चकमकीमध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड जखमी झाले आहेत पुणे जिल्ह्यातील चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोशी गावात रात्री साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली.
गेल्या आठवड्यात सदर भागात एका घरावर या दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. तेव्हा एका पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यातील दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या टोळीतील आणखी दोघे रविवारी (दि. २) पुन्हा चिंचोशी गावात दरोडा टाकायला येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर डीसीपी शिवाजी पवार हे एपीआय जराड यांच्यासह आठ जणांचे पथक घेऊन रात्री दहा वाजता गावात पोहचले. त्यावेळी गावातील मंदिर परिसरात दोघे दबा धरुन बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्या परिसरात सापळा रचण्यात आला. रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास स्वतः डीसीपी आणि एपीआय दोन दरोडेखोरांच्या दिशेने निघाले. या दोघांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र, दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डीसीपी पवार आणि एपीआय जराड पुढे सरसावले.
दोघांपैकी एक अल्पवयीन असलेला आरोपी निसटून जाण्यात यशस्वी झाला. तर दुसऱ्याने थेट कोयता बाहेर काढला. बचावासाठी डीसीपी पवार यांनी बंदूक बाहेर काढली. त्यानंतर देखील दरोडेखोराने पवार यांच्यावर कोयत्याने वार केल्यावर पवार थोडे मागे आले. परंतु, ते वार चुकवू शकले नाहीत, त्यांच्या छातीला कोयता चाटून गेला. त्यामुळे पवार रक्तबंबाळ झाले. या परिस्थितीत त्यांनी एक गोळी दरोडेखोराच्या दिशेने झाडली, ती त्याने चुकवली. मग एपीआय जराड दरोडेखोराला पकडण्यासाठी पुढे आले असता त्याने त्यांच्यावरही देखील वार केला. हा वार जराड यांच्या डाव्या खांद्यावर झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या डिसीपी पवार यांनी दुसरी गोळी थेट दरोडेखोराच्या पायावर झाडली, यामध्ये तो जमिनीवर कोसळला. मग त्याला जेरबंद करण्यात आले. दुसरीकडे पळून जायच्या प्रयत्नात अल्पवयीन मुलाला पथकातील इतरांनी ताब्यात घेतले.
जवळपास वीस मिनिटे पोलीस आणि या दरोडेखोरांमध्ये चकमकीचा थरार रंगला होता. डिसीपी पवार यांच्या छातीवर पाच टाके पडले आहेत. ते थोडक्यात बचवल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तर एपीआय जराड यांना देखील मोठी दुखापत झाली आहे. उपचारानंतर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमी झालेल्या दरोडेखोरावर उपचार असू असून अल्पवयीन मुलगा ताब्यात आहे. डीसीपी शिवाजी पवार , एपीआय प्रसन्न जराड आणि पथकाने तिसरा दरोडा टाकण्यापूर्वी या टोळीच्या मुसक्या आळवल्या आहेत.
