*स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात सांडपाणी व अपशिष्ट प्रक्रिया प्रकल्पासाठी ४ कोटींचा निधी मंजूर, आ नमिता ताई मुंदडा यांच्या प्रयत्नाला यश
*स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात सांडपाणी व अपशिष्ट प्रक्रिया प्रकल्पासाठी ४ कोटींचा निधी मंजूर*
*आ. नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश, रुग्णालयाच्या पर्यावरण सुधारासाठी महत्त्वाचा निर्णय*
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे सांडपाणी व अपशिष्ट प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून ४ कोटी ७ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश लाभले असून, त्यांच्या प्रयत्नातूनच हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे पर्यावरणावर होत असलेल्या परिणामाचा विचार करता या प्रकल्पाची गरज जाणवली होती. शासनाच्या प्रशासकीय मान्यतेनंतर आता रुग्णालयात सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह अपशिष्ट व्यवस्थापनासाठी सुसज्ज तंत्रज्ञानाचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यामुळे रुग्णालयाच्या परिसरातील पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम टळणार आहे. या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या यंत्रणा आधुनिक असून रुग्णालयातून निर्माण होणारे द्रव अपशिष्ट योग्य पद्धतीने प्रक्रियेनंतर निर्जंतुक करण्यात येईल.
अंबाजोगाईच्या या वैद्यकीय महाविद्यालयात बीड जिल्ह्यासह मराठवाडा परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे सांडपाणी व कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासाठी या दोन्ही प्रकल्पांची आवश्यकता होती. या प्रकल्पांमुळे रुग्णालयाचा परिसर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि पर्यावरणास हितकारक राहणार आहे.
अतिशय महत्वाचा हा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
