Skip to content
सास-याच्या खुन प्रकरणी जावायास जन्मठेप–जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई यांचा महत्वपूर्ण निकाल

अंबाजोगाई-
सास-याच्या खून प्रकरणी जावयास जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती डॉ. रचना तेहरा यांनी ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे केंद्रेवाडी येथील मयत दत्तात्रय गायके याची मुलगी रेखा गायके हिचा विवाह आरोपी रामेश्वर गायके याचेशी झाला होता. लग्न होवुन ८ वर्षात आरोपीस काहीही मुलबाळ झाले नाही. त्यामुळे आरोपी हा त्याची पत्नी रेखा हिस मला दुसरे लग्न करावयाचे आहे व त्यासाठी तुइ-या वडीलाने परवानगी द्यावी. यासाठी सतत छळ करीत होता. दरम्यान मयताचा मुलगा मल्हारी गायके याचे लग्न ११.०६.२०२३ रोजी ठरले होते. त्यामुळे आरोपी याविषयी मनात राग बाळगुन होता. आरोपी हा दि. ०७.०६.२०२३ रोजी केंद्रेवाडी येथे आला. त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते व मयत शेतातील आखाडयावर झोपावयास गेले होते. आरोपीने मयताची घरी चौकशी करून तो शेतातील आखाडयावर गेला व आरोपीने मयतास धारदार कत्तीने २७ वार करून ठार मारले. यावरून धारूर पोलिस ठाणे येथे गुरनं १७६/२३, कलम ३०२ भादंवि प्रमाणे आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद झाला. सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलिस अधिक्षक पंकजकुमार कुमावत यांचेकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान पंकज कुमावत यांनी आरोपीविरूद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी आखाडया शेजारील शेतकरी बंडू राजेभाउ गिरी, लक्ष्मण संपती केंद्रे, तपासअधिकारी पंकज कुमावत यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा, साक्षीदारांची साक्ष व सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपीस दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात अॅड. अनंत तिडके यांनी सरकार पक्षास सहाय्य केले.
Post Views: 262
error: Content is protected !!