*योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम*
*योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये विविध प्रशिक्षण कार्यक्रम*
अंबाजोगाई:- योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित, कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक व भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (MSME) अंतर्गत इंडो जर्मन टूल रूम, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ सप्टेंबर ते दि.०४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.चंद्रशेखर बर्दापूरकर यांच्या संकल्पनेतून योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम चालू असतानाच उद्योग समूहांच्या आधुनिक तंत्रज्ञान व मशीन याबाबत माहिती मिळाल्यास हे विद्यार्थी अधिक कौशल्यपूर्ण पद्धतीने विविध उद्योग समूहांमध्ये काम करू शकतील या हेतूने योगेश्वरी पॉलिटेक्निक येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल स्टेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर मेंटेनन्स आणि नेटवर्किंग, ऑटोमोबाईल व मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांसाठी सीएनसी मशिनिंग व प्रोग्रामिंग व सर्व विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम या विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. इंडो जर्मन टूल रूम औरंगाबाद यांच्या वतीने अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर मराठवाडा विभागात प्रथमतः योगेश्वरी पॉलिटेक्निक मध्ये घेण्यात येत आहे. या प्रशिक्षण शिबिरांचा उद्घाटन समारंभ दि २९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध उद्योजक व योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक मा. प्रताप पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मा. राजेश चंचलानी व इंडो जर्मन टूल रूम चे अभियंते मा. अनिकेत देशमुख उपस्थित होते.
या शिबिरासाठी विभागप्रमुख प्रा. रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या उपक्रमाबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बर्दापूरकर, उपाध्यक्ष श्री गणपत व्यास, का. उपाध्यक्ष ॲड जगदीश चौसाळकर, सचिव श्री. कमलाकरराव चौसाळकर यांनी अभिनंदन केले आहे. अशी माहिती कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे यांनी दिली.
