Skip to content
*अंबाजोगाई नगरपरिषदेच्या अध्यक्षपदा साठी
राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, शेख रहीमभाई, बबनभैया लोमटे, शोभाताई लोमटे, अनंतदादा लोमटे प्रभावी उमेदवार*

————————————
*अंबाजोगाई
राज्यातील 247 नगरपरिषदा 147 नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण आज सोमवार दि. 06 ऑॅक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील नगरविकास विभागाच्या दालनात नगरविकास राज्यमंत्री ना. माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. अंबाजोगाईचे नगराध्यक्षपद सुरुवातीला ओबीसी प्रवर्गाला सुटल्याची माहिती प्रसार माध्यमात व सोशल मिडियात पसरली होती. दिवसभर हे माहिती सर्वदूर पसरली. परंतु संध्याकाळी 5 वाजता मात्र अंबाजोगाईचे नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट झाले. अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणुक आता रंगतदार होणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांची नांवे पटलावर आली आहेत तर प्रतिस्पर्धे असलेल्या भाजपाकडून युवा नेते अक्षय मुंदडा, माजी उपनगराध्यक्ष शेख रहिमभाई, श्रीमती शोभाताई लोमटे व माजी उपनगराध्यक्ष अनंतदादा लोमटे यांची नांवे पटलावर आली आहेत. काँग्रेसकडून आसेफोद्दीन खतीब यांचे नाव पुढे आलेले आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, काँग्रेस आय, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे गट, रिपाई यांचेही उमेदवार आयत्यावेळी मैदानात येतील. जवळपास महिनाभरानंतर निवडणुका होणार आहेत परंतु रणनिती जोरदारपणे सुरु झाली आहे.
अंबाजोगाई नगरपालिकेची निवडणुक 9 वर्षानंतर होवू घातली आहे. कोरोना काळामुळे आणि न्यायालयीन निवाडयामुळे 4 वर्ष निवडणुकीचा कार्यक्रम लांबलेला होता. इच्छुक उमेदवारांचे कंबरडे हे आजपर्यंत खर्च करु करु मोडले होेते अखेर एकदाची ही निवडणुक जाहिर झाली आणि प्रक्रिया सुद्धा गतिमान झाली आहे. राज्य सरकारने जनतेतेतून नगराध्यक्ष करण्याची भुमिका घेतली त्यासोबतच प्रभाग निहाय वार्डाची रचना करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदाचे रोटेशन तोडून पुन्हा नव्याने रोटेशन निर्माण करत अध्यक्षपदाचे आरक्षण हे नव्याने जाहिर करण्यात आले. राज्यातील 247 नगरपरिषदा व 147 नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण नगरविकास राज्यमंत्री ना.माधुरी मिसाळ यांच्या दालनात आज सोमवार दि. 06 ऑक्टोबर रोजी काढण्यात आले. यात अंबाजोगाई नगरपरिषदेचे अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी जाहिर झाले आहे. दिवसभर अंबाजोगाईचे नगराध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गाला सुटल्याची माहिती मुंबई येथून विश्वसनीय सुत्राकडून प्राप्त झालेली होती. मात्र नगरविकास विभागाने नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाचे पत्र निवडणुक आयोगाला सादर केले त्या पत्रात अंबाजोगाईचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला सुटल्याची अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला सुटल्याने अनेक इच्छुक उमेदवार पुढे येत आहेत. अनेक अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदाची निवडणुक लढवतील अशी शक्यता आहे. परंतु सध्या प्रामुख्याने 2 पक्षात व दोन नेत्यात तुल्यबळ लढत होईल असे चित्र आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाकडून प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांचे नाव आघाडीवर आहे त्यासोबतच माजी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपाकडून युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांचे नाव आघाडीवर आले आहे. खुल्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या तरुण फळीने अक्षय भैय्या फिक्स, लागा कामाला असा ट्रेंड सोशल मिडियावर चालविला त्यामुळे त्यांचे नाव पुढे आले आहे. त्यांच्यासोबतच माजी उपनगराध्यक्ष शेख रहीमभाई, श्रीमती ॲड.शोभाताई लोमटे व माजी उपनगराध्यक्ष अनंतदादा लोमटे यांचेही नाव पुढे येत आहे. पक्ष उमेदवारी देताना काय निकष लावतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. यावेळची निवडणुक अटीतटीची व प्रतिष्ठेची होणार हे अधोरेखीत होत आहे. आणखी महिनाभरात पुलाखालून बरेच पाणी जावयाचे आहे. त्यामुळे काय काय बदल होतात, कोण कोण या पक्षातून त्या पक्षात उडया मारतात, आणि आयत्या वेळी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे येणार्या काळात स्पष्ट होईल.
Post Views: 187
error: Content is protected !!