अंबासाखर कारखाना परीसरातील त्या हल्ल्यातील जखमीचा अखेर मृत्यू, अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात खुणाचा गुन्हा दाखल

अंबाजोगाई: (प्रतिनिधी )
शहरा लगतच्या अंबासाखर कारखाना परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेल्या कुऱ्हाड हल्ल्यातील गंभीर जखमी धनराज ओमप्रकाश कांबळे यांचा अखेर मृत्यू झाला आहे. लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंबासाखर कारखाना परिसरातील गणेश गाळुंके यांच्या चप्पल दुकाना समोर २९ डिसेंबर रोजी सकाळा साडेसातच्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला होता. आरोपी समीर सिकंदर पठाण याने जुन्या भांडणाची कुरापत काढून धनराज ओमप्रकाश कांबळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले होते. हा हल्ला इतका भीषण होता की धनराज जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. भांडण सोडवण्यासाठी गेलेला अक्षय परमेश्वर कणसे या तरुणालाही आरोपीने लोखंडी हातोड्याने मारहाण करून जखमी केले होते.
गंभीर जखमी धनराजवर लातूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र सहा दिवसांच्या झुंझीनंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत धनराजचा भाऊ युवराज ओमप्रकाश कांबळे याने अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपी समीर सिकंदर पठाण याला यापूर्वीच अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. धनराजच्या मृत्यूनंतर आता या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास स्वतः ऋषिकेश शिंदे करीत आहेत.
Post Views: 1,909