लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात, बीड एसीबीच्या धडाकेबाज कार्यवाहीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ
लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाच लुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात, बीड एसीबीच्या धडाकेबाज कार्यवाहीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :
परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना आज शुक्रवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आली असून तक्रारदाराकडून सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) महाराष्ट्र बीड कार्यालयाकडे करण्यात आली होती.
या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून ही कारवाई पार पडली.
सालंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे.
एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून, प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Post Views: 812


