Skip to content
——————–
कौतुकामुळे महिलांना मोठे कार्य करण्याची प्रेरणा मिळते-प्रा.रोहिणी पाठक
——————–
‘परळी संचार’च्या वतीने महिलादिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

——————–
परळी वैजनाथ, ता.०८ (बातमीदार)ः- कौतुकामुळे महिलांना मोठे कार्य करण्याची प्रेरणा आणि संधी मिळते, उल्लेखनिय कार्य करणार्या महिलांच्या पाठीशी समाज उभा रहातो याचा आदर्श इतर महिलांनीही घेतला पाहिजे असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्त्या व रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ.रोहिणी अजय पाठक यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या कर्तृत्ववान महिलांचा ‘सा.परळी संचार’च्या वतीने गौरव करण्यात आला. शहरातील नाथ चित्र मंदिर परिसरातील भागवत पॅलेसच्या तनिष्क फंक्शन हॉलमध्ये रविवारी (ता.८) दुपारी हा कार्यक्रम झाला. यावेळी सौ.पाठक बोलत होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.स्वाती विलासराव ताटे, नवउद्योजिका उत्पलवर्णा अमोल कांबळे यांच्यासह संपादक अनंत कुलकर्णी, सौ.शितल कुलकर्णी उपस्थित होते.
सौ.रोहिणी पाठक पुढे म्हणाल्या, महिलांनी एकमेकींना उर्जा दिली पाहिजे, गुणांचे कौतुक केले पाहिजे असे सांगून त्यांनी सुर्यफुलाचा आदर्श समोर ठेवून आपली वाटचाल केली पाहिजे, चांगले काम करणार्या महिलांच्या पाठीशी समाज उभा रहातो असे सांगून त्यांनी ‘परळी संचार’ने महिलांच्या कामगिरीला केवळ बातम्यांमधून प्रसिद्धी दिली नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढणार असल्याचे सौ.पाठक यांनी सांगितले.
प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांनी केले.

महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे, अशी संधी देणारा समाज आपण निर्माण करूया असे आवाहन करून ज्या महिलांचा यानिमित्ताने गौरव होत आहे, त्यांच्या कार्याला श्री वाकडे यांनी उजाळा दिला. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.शालीनी कराड यांनी स्त्रीचा सन्मान हा एक दिवस करून जमणार नाही, तिचा दररोज सन्मान झाला पाहिजे, स्त्री शक्तीचा आदर आणि पूजा घरोघरी झाली पाहिजे असे आवाहन करून कर्तृत्ववान महिलांचा आदर्श इतर महिलांनीही घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. वर्षाराणी हाके यांनी बोलताना स्त्रीचा जिथे आदर असतो तिथे देवाचा वास असतो असे सांगितले.

नगरसेविका अर्चना रोडे यांनी या गौरवामुळे समाजात काम करण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या. उत्पलवर्णा कांबळे यांनी सांगितले की, समाजामध्ये चांगले काम केल्यावर समाज पाठीशी राहातो असे सांगून त्यांनी समाजाने स्त्रीच्या कर्तृत्वाला वाव देण्याबरोबरच त्यांचा आदर ठेवला पाहिजे असे आवाहन केले. सौ.स्वाती ताटे यांनी यावेळी बोलताना संस्कृती, संस्कार याची आज घराघरात जपवणूक व्हावी, स्त्रीचा सन्मान राखला जावा असे आवाहन केले. सुत्रसंचालन ईशिका अमोल कांबळे या विद्यार्थिनींने केले तर आभार प्रदर्शन सौ.शितल कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार अविनाश मुडेगावकर, प्रा.अजय पाठक, डॉ.बालासाहेब कराड, डॉ.सौ.शिखा जैन, पत्रकार रामप्रसाद शर्मा, प्रा.प्रवीण फुटके, जगदीश शिंदे, श्रीराम लांडगे, दत्ता शिवगण, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर महाराज कोकाटे, अमर देशमुख, रामराव कांबळे, अमोल कांबळे, राहूल ताटे, श्री बंडगर, सुनील जोशी, सौ.भाग्यश्री केंद्रे, सविता वारद, अर्चना गोजे, अश्विनी तांदळे, कृष्णा बेदरकर आदी मान्यवर, महिला, पत्रकार उपस्थित होते.
Post Views: 116
error: Content is protected !!