Skip to content
*अबब! शासकीय कार्यालयांनी थकवला अंबाजोगाई नगर पालिकेचा 2 कोटींचा मालमत्ता कर*
*वसुलीसाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आक्रमक; कार्यालयांना धाडल्या नोटीसा*

अंबाजोगाई: शहराच्या विकासासाठी आणि पालिकेच्या आर्थिक शिस्तीसाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. शहरातील अनेक शासकीय कार्यालयांनी नगर पालिकेचा तब्बल २ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालिकेचा गाडा रुळावर आणण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यासाठी आता या थकबाकीदार कार्यालयांना नोटीसा धाडण्याचे सत्र सुरू झाले आहे.
अंबाजोगाई नगर पालिकेची आर्थिक स्थिती मागील काही वर्षांत खालावली होती. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कंत्राटी कामगारांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी कारभार हाती घेतल्यापासून सक्त वसुलीवर भर दिला आहे. पालिकेच्या उत्पन्नातूनच कर्मचाऱ्यांचे पगार, शहरातील पथदिव्यांचे बिल, पंप हाऊस, फिल्टर3 हाऊसचा खर्च आणि कंत्राटदारांची देणी भागवली जातात. मात्र, मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने पालिकेच्या कामात अडचणी येत होत्या.
नगर पालिकेच्या वसुली विभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, शहरातील सामान्य नागरिकांपेक्षा मोठ्या शासकीय संस्था आणि कार्यालयांकडेच कोट्यवधी रुपयांचा कर थकीत आहे. यामध्ये प्रामुख्याने तहसील कार्यालय, मांजरा प्रकल्प, पोलीस विभाग आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
*प्रमुख पाच थकबाकीदार कार्यालये आणि थकबाकी (रुपये):*
नगर पालिकेच्या दप्तरी नोंद असलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक थकबाकी असलेले प्रमुख पाच विभाग खालीलप्रमाणे आहेत:
१. मांजरा प्रकल्प, अंबाजोगाई – २५,२२,४३२/-|
२. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, मोरेवाडी – २३,७१,७७९/-
३. कार्यकारी अभियंता, बीड – २१,७१,७९९/-
४. अंबाजोगाई तहसीलदार – २१,०१,५७५/-
५. गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ (MHADA), छत्रपती संभाजीनगर – ९,९२,६५८/-
या व्यतिरिक्त जिल्हा परिषद कन्या शाळा, पोलीस विभाग, पोस्ट ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही मोठ्या रकमा थकीत आहेत. अजूनही यादी करणे सूरच असून थकीत रकमेत आणखी वाढ होणार आहे. ही केवळ मालमत्ता कराची थाबाकी असून थकीत पाणीपट्टीची रक्कम अद्याप अंतिम होणे बाकी आहे. या सर्व कार्यालयांना पालिकेमार्फत नोटीसा बजावण्यात आल्या असून, तातडीने कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोटीस देऊनही कर भरणा न करणाऱ्या कार्यालयांवर येणाऱ्या काळात कठोर कारवाई करण्याचे संकेत नगर पालिका प्रशासनाने दिले आहेत. शासनाचे काम करणाऱ्या या कार्यालयांनीच जर कर थकवला, तर पालिकेने शहराचा विकास कसा करावा, असा परखड प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहणार नाही आणि पालिकेचा आर्थिक कारभार सुरळीत होईल, याला आपले प्राधान्य असल्याचे नगराध्यक्ष मुंदडा यांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 296
error: Content is protected !!