ताज्या घडामोडी

शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची सजग अंबाजोगाईकरांची मागणी*

*शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरणातील फरार आरोपीला अटक करून सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची सजग अंबाजोगाईकरांची मागणी*


====================

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील शुभांगी शिंदे हुंडाबळी प्रकरणातील राजकिय वरदहस्त असलेल्या फरार आरोपीस तात्काळ अटक करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. जेणेकरून समाजात अन्य कोणीही हुंडा घेणे किंवा देणे या प्रकारास आळा बसेल या प्रकारच्या मागणीचे निवेदन सजग अंबाजोगाईकरांच्या वतीने उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांना दिले आहे.सदरील निवेदन देतांना सजग अंबाजोगाईकर म्हणून मनस्विनी महिला प्रकल्पाच्या अरुंधती लोहिया, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सहसचिव डॉ राजेश इंगोले रोटरी क्लबचे धनराज सोळंके, इनरव्हील क्लबच्या श्रीमती सुरेखा शिरसाट खंडाळे मॅडम, डॉ नरेंद्र काळे, साहीत्य परिषदेचे डॉ धाकडे, शिक्षक मैत्री प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय रापतवार , अनंत जगातकर, भीमाशंकर शिंदे, पीडिता शुभांगी शिंदे यांचा भाऊ प्रदीप साळुंके यांच्यासह अंबाजोगाई तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघाचे ऍड अनंत जगतकर, पद्माकर सेलमोहकर ,आशा हबीब, डॉ दिलीप खेडगिकर यांच्यासह शहरातील विविध शाळातील अनेक विद्यार्थिनी , शिक्षक तथा शिक्षिका,पत्रकार, डॉक्टर्स, प्राध्यापक यांच्यासह अनेक संवेदनशील अंबाजोगाईकर सहभागी झाले होते.
एकेकाळी पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या राज्यात सातत्याने अमानुष घटनांची नोंद होत आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्रभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे हीस हुंड्‌यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरण गाजत असतानाच अंबाजोगाई तालुक्यात हुंडाबळीची अशीच एक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. धारूर येथील मोहखेड माहेर असलेली शुभांगी संतोष शिंदे या उच्चशिक्षित विवाहितेस हुंड्‌यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे. शुभांगी चा विवाह गीत्ता गावच्या संतोष शिंदे यांच्याशी २०२२ मध्ये संपन्न झाला. त्यावेळी वर पक्षाकडनं केलेल्या मागणीनुसार हुंडा दिलेला असताना सतत पैशाची मागणी केली जात होती. माहेरून पैसे घेऊन ये असा दबाव तिच्यावर आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. शुभांगीचा मृत्यू हा संशयास्पद आहे. अशा आशयाची फिर्यादही तिच्या भावाने पोलिसांमध्ये केलेली आहे. हुंडा प्रतिबंध अधिनियम 1962 लागू होऊन देखील आजही सर्व जाती-धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो आणि त्याचाच परिणाम महिला व मुलांच्या शोषणामध्ये होतांना दिसून येतो. बालविवाह, कौटुंबिक हिंसा आणि बाल लैंगिक अत्याचार या समस्यांना हुंडा ही सामाजिक कूप्रथा अनेकदृष्टीने कारणीभूत आहे. या कूप्रथेंचा वापर करून नवविवाहितांचा छळ करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबाचा तीव्र निषेध करत असल्याचे आणि पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी समस्त जागृत समाज आहे हा विश्वास त्यांना मिळावा आणि यापुढील घटनांना चाप बसावा याकरिता हे आंदोलन असल्याचे आपल्या निवेदनाद्वारे सजग अंबाजोगाई करांनी सांगितले. यावेळी प्रा अरुंधती पाटील, डॉ राजेश इंगोले यांच्यासह अनेकांनी आपली मनोगत व्यक्त करत शुभांगी शिंदे तसेच वैष्णवी हगवणे यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!