Wednesday, February 4, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*अनुष्का पाटोळे प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व गतीने व्हावी – डॉ.राजेश इंगोले* *अनुष्का पाटोळे प्रकरणी तपास यंत्रणेत अनेक चुका – कॉ.बब्रुवाहन पोटभरे*

*अनुष्का पाटोळे प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व गतीने व्हावी – डॉ.राजेश इंगोले*

*अनुष्का पाटोळे प्रकरणी तपास यंत्रणेत अनेक चुका – कॉ.बब्रुवाहन पोटभरे*


======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील सहावीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिचा ५ जानेवारी २०२६ च्या सुमारास वसतिगृहातील खोलीत संशयास्पद मृत्यू झाला. पालकांनी हा घातपात असल्याचा आरोप करीत तक्रार केली, त्यानंतर दोन महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली व विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पोलीस तपासात मारहाणीचे पुरावे सापडले असून हे प्रकरण गंभीर झाले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते कॉ.बब्रुवाहन पोटभरे, माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले आणि कॉ.विश्वांभर भोसले यांनी नुकतीच कु.अनुष्का पाटोळे राहत असलेल्या लातूर येथील टाका या गावी भेट देऊन तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि या संघर्षात पूर्णपणे न्याय मिळेपर्यंत या कुटुंबासोबत राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी डॉ.राजेश इंगोले यांनी या प्रकरणातील महत्त्वाचे आक्षेपार्ह मुद्दे मांडताना या मृत्यूबाबत शंका घेत अनुष्काचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता, मात्र शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याने यात घातपाताचा संशय व्यक्त केला. तसेच या प्रकरणी झालेल्या पोस्टमार्टम रिपोर्टची विडिओ रेकॉर्डिंग डीएमइआर कडे पाठवून यावर दुसऱ्या ठिकाणच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे अभिप्राय घेण्यात यावे अशी मागणी डॉ.राजेश इंगोले यांनी यावेळी केली. तसेच याआधीही याच शाळेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी येथील शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याची देखील चौकशी सुरू आहे. या अनुषंगाने देखील या प्रकरणाचा तपास होण्याची गरज आहे. जी मुलगी वयाच्या अकराव्या वर्षी संपूर्ण संविधान वाचून काढते आणि शालेय जीवनात विविध महापुरूषांच्या जीवनावर आत्मविश्वासाने भाषणे देते, तिची मानसिकता आत्महत्या करण्याची असूच शकत नाही. तसेच मृत्यूच्या तीन दिवस आधी अनुष्काने तिच्या पालकांना फोन करून फोनवर रडत-रडत आणि स्थानिक शालेय प्रशासन तिच्यावर अन्याय करीत असल्याचे सांगितले असे तिच्या आईने आम्हाला सांगितले. हा अन्याय अत्याचार कोणत्या स्वरूपाचा होता किंवा अनुष्काला तिथल्या काही गैरप्रकारांची माहिती मिळाली होती का..? याबाबतची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. यावेळी कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांनी घटनेच्या आदल्या रात्री एका महिला पर्यवेक्षिकेने मारहाण केल्याचे व त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडल्याचे तपासात समोर आल्याचे सांगत ज्या स्थितीत अनुष्काचा मृतदेह आढळून आला त्या स्थितीत आत्महत्या घडू शकते का..? हा प्रश्न उपस्थित करून हा घातपात असल्याची शंका व्यक्त केली. या प्रकरणी केवळ दोन कंत्राटी पद्धतीने कामाला असलेल्या महिलांना अटक करण्यात आली असून त्या शाळेचे प्राचार्य, शिक्षक वसतिगृहाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे का दाखल केले गेले नाहीत हा प्रश्न प्रशासनाला केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी झिरो टॉलरन्स धोरणाचे आश्वासन दिले आहे. पण, तपास कासवगतीने सुरू असल्याने या तपासात दिरंगाई का होत आहे हा सवाल कॉ.पोटभरे यांनी प्रशासनाला करीत याची सीबीआय तपासणी करावी अशी मागणी केली. तर यावेळी बोलताना विश्वांभर भोसले यांनी या प्रकरणी न्यायासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची तयारी आहे. सदरील प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी ही मागणी केली आहे. या प्रकरणी अनुष्काला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी विविधस्तरांतून मागणी होत असून अनेक ठिकाणी बंद सारखे निषेध आंदोलनेही झाली आहेत. या प्रकरणाच्या या ३-४ दिवसांतील तपासात, मारहाणीच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण फक्त आत्महत्येचे नसून हत्येचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

======================

======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!