Skip to content
आयएमए योगेश्वरी शाखेचा पदग्रहण सोहळा उत्साहात
डॉ. राहुल धाकडे अध्यक्षपदी; डॉक्टरांची समाजसेवा कौतुकास्पद – डॉ. संतोष कुलकर्णी

अंबाजोगाई (प्रतिनिधी):
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) योगेश्वरी शाखा, अंबाजोगाई यांचा पदग्रहण सोहळा रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरातील हॉटेल पियुष इन येथे उत्साहात संपन्न झाला. या वेळी आयएमए योगेश्वरी शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे यांची निवड करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, स्वा. रा. ती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकरराव धपाटे, आयएमए मुख्यालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश भराटे व आयएमए राज्य सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले हे उपस्थित होते. विशेष निमंत्रित म्हणून डॉ. सत्यप्रेम वारे (आयएमए कळंब), डॉ. श्यामसुंदर काकानी (आयएमए माजलगाव) व डॉ. अजय नारायणकर यांनी उपस्थिती दर्शविली.

प्रारंभी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी नुतन अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांना चार्टर देऊन पदभार सुपूर्द केला. त्यानंतर राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करून सर्व पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.
या वेळी सचिव डॉ. उद्धव शिंदे, उपाध्यक्ष डॉ. विजय लाड, कोषाध्यक्ष डॉ. बळीराम मुंडे, सहसचिव डॉ. अतुल शिंदे व डॉ. निलेश तोष्णीवाल, सांस्कृतिक सचिव डॉ. नितीन पोतदार, डॉ. अनिल मस्के व डॉ. सुनील जाधव, क्रीडा सचिव डॉ. शिवराज पेस्टे व डॉ. संदीप जोगदंड, राज्य समन्वयक डॉ. विनोद जोशी, माजी अध्यक्ष (आयपीपी) डॉ. नवनाथ घुगे तसेच महिला शाखेच्या अध्यक्षा डॉ. मनीषा पवार, सचिव डॉ. जिगिशा मरवाळे व माजी अध्यक्षा डॉ. अरुणा केंद्रे यांनी पदभार स्वीकारला.
मार्गदर्शन करताना डॉ. संतोष कुलकर्णी यांनी आयएमएच्या माध्यमातून डॉक्टर समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. संघटनेची गरज, डॉक्टर–रुग्ण संवाद, वैद्यकीय कायदे, आरोग्य विषयक अर्थसंकल्पीय तरतुदी व मोफत रुग्णसेवेबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी डॉक्टर बांधवांसाठी नगरपरिषद व आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांचे सहकार्य नेहमीच राहील, अशी ग्वाही दिली. डॉक्टरांचे सामाजिक योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नुतन अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांनी मनोगतात आगामी दोन वर्षांत आयएमएच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. अंबाजोगाई येथे एकदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमात डॉ. रमेश भराटे, डॉ. राजेश इंगोले व डॉ. शंकरराव धपाटे यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन डॉ. मनीषा पवार व डॉ. जिगिशा मरवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
Post Views: 92
error: Content is protected !!