Skip to content
वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ट्रक चालक व व्यापाऱ्यांना पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांचा दणका

अंबाजोगाई: मुख्य सार्वजनिक रस्त्यावर मालवाहू ट्रक उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी एका चालकावर कायदेशीर कारवाई केली आहे. ही घटना शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:४५ ते १०:५५ च्या सुमारास मोंढा मार्केट परिसरातील सतीश सर्विस पॉईंटसमोर घडली. या कारवाईमुळे रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तानाजी शेषराव सूर्यवंशी (वय २८, रा. सावणगिरा, ता. निलंगा, जि. लातूर) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाळासाहेब ज्ञानोबा पारवे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यशवंतराव चव्हाण चौकाकडून मोंढा मार्केट कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ट्रक (क्रमांक MH 24 AU 7741) अत्यंत निष्काळजीपणे उभा करण्यात आला होता. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित ट्रक जप्त केला आणि पोलीस स्टेशनला लावला. त्यानंतर नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडून वाहन ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सफौ गोले यांनी गुन्हा दाखल केला आहे, तर पोलीस अंमलदार फड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी स्थानिक व्यापाऱ्यांना आणि वाहनधारकांना स्पष्ट ताकीद दिली आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचे सामान चढ-उतार करताना सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खात्री करणे बंधनकारक आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत सामानाची लोडिंग-अनलोडिंग टाळावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
अंबाजोगाई शहर पोलिसांनी जारी केलेल्या जाहीर आवाहनानुसार, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणे, पिण्याच्या पाण्याच्या जारच्या गाड्या उभ्या करणे किंवा विक्रीचे गाडे लावून रस्ता अडवणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. मागील तीन महिन्यांत अशा प्रकारचे १० गुन्हे दाखल करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची वाहने किंवा साहित्य जप्त करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Post Views: 148
error: Content is protected !!