ताज्या घडामोडी

*राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीप्रकरणी घाटनांदूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी*

*राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीप्रकरणी घाटनांदूरच्या ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी*

अंबाजोगाई प्रतिनिधी :
घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महेश फड यांच्याविरोधात सकल धनगर समाजाच्या वतीने पंचायत समिती अंबाजोगाईचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दि. 31 मे 2026 रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभरात आणि महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शासनाच्या नियमांनुसार महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असताना घाटनांदूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महेश फड हे अनुपस्थित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, त्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी उध्दट व बेजबाबदार भाषेत उत्तर दिल्याचा तसेच समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकारामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित अधिकाऱ्यांचे वर्तन शासकीय सेवकाला शोभणारे नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सकल धनगर समाजाने आपल्या निवेदनात महेश फड यांना कर्तव्यकसुरी व समाजाचा अपमान केल्याबद्दल तात्काळ सेवेतून कार्यमुक्त करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करून शासकीय नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय शासकीय पदाचा गैरवापर करून सामाजिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनामुळे घाटनांदूर परिसरात चर्चा रंगली असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!