दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन!
घर बंद करून बाहेरगावी जाताना विशेष काळजी घ्या; चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना, संशयास्पद हालचाली दिसल्यास ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन!

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना अनेक कुटुंबे सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात असतात. याच संधीचा फायदा घेत बंद घरांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन बीड जिल्हा पोलीस दलाच्या अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक कुटुंबासह गावाकडे किंवा पर्यटनासाठी जात असल्याने घरे बंद राहतात. अशा परिस्थितीत घरफोडी व चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारे जनजागृती आवाहन प्रसिद्ध केले आहे.
घर सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांच्या महत्त्वपूर्ण सूचना
नागरिकांनी घराचे मुख्य दरवाजे, मागील दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद करून कुलूप लावावे. शक्य असल्यास अतिरिक्त सुरक्षा लॉकचा वापर करावा. घरात सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ डोअर बेल व सुरक्षा अलार्म बसवावेत. घरातील मौल्यवान दागिने, रोख रक्कम व महत्त्वाच्या वस्तू उघड्यावर ठेवू नयेत. शक्यतो बँकेच्या लॉकरचा वापर करावा.
घर बंद असताना घरातील दिवे व बाहेरील लाईट सुरू ठेवण्यासाठी ऑटोमॅटिक टायमर किंवा स्मार्ट लाईट सिस्टीमचा वापर करावा. अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करावीत. तसेच बाहेरगावी जात असल्याची माहिती शेजारी, सोसायटी पदाधिकारी किंवा विश्वासू व्यक्तींना द्यावी.
वृत्तपत्रे, दूध व पाण्याची नियमित येणारी व्यवस्था काही दिवसांसाठी बंद करावी. बाहेरगावी जात असल्याचे फोटो, प्रवासाचे तपशील किंवा घर रिकामे असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकणे टाळावे. घराच्या चाव्या शू रॅक, मीटर बॉक्स किंवा दरवाजाजवळ लपवून ठेवू नयेत.
पोलिसांकडून विशेष गस्त व तपासणी
दिवाळीच्या काळात चोरीच्या घटना रोखण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांकडून विशेष पोलीस गस्त घालण्यात येणार असून संवेदनशील भागात पेट्रोलिंग व बिटमार्शलमार्फत तपासणी केली जाणार आहे. संशयित व्यक्ती व वाहनांवर लक्ष ठेवण्यासह बंद घरे असलेल्या परिसरात नियमित गस्त घालण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
संशयास्पद हालचाली दिसल्यास ११२ वर संपर्क साधा!
आपल्या परिसरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसल्यास, घरफोडीचा प्रयत्न अथवा कोणतीही संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. यासाठी पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या घराच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका. नागरिकांनी स्वतःच्या घरासोबतच शेजाऱ्यांच्या घरांचीही काळजी घ्यावी. नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची सतर्कता यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालणे शक्य होणार आहे.
‘सतर्क राहा, सुरक्षित राहा!’ हा संदेश देत अंबाजोगाई शहर पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.


