अमर भैय्या देशमुख यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर निवड! खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पुढाकारातून अंबाजोगाईच्या कार्यकर्त्याला संधी; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
अमर भैय्या देशमुख यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रवासी सल्लागार समितीवर निवड!
खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पुढाकारातून अंबाजोगाईच्या कार्यकर्त्याला संधी; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर भैय्या देशमुख यांची दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर (DRUCC) सदस्य म्हणून निवड झाली आहे. बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी त्यांना ही संधी दिल्याने अंबाजोगाई परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
अमर देशमुख हे धडाडीचे आणि सामाजिक जाण असलेले कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील विविध प्रश्नांवर ते सातत्याने सक्रिय राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करतात.
खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात अमर देशमुख यांनी अंबाजोगाई तालुक्यात प्रचारासाठी पुढाकार घेतला होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची रेल्वे प्रवासी सल्लागार समितीवर निवड झाल्याचे मानले जात आहे.
या निवडीमुळे रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, प्रवासातील सुविधा आणि रेल्वेसंबंधित प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्याची संधी अमर देशमुख यांना मिळणार आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांचे प्रश्न मार्गी लागावेत आणि त्यांच्या सामाजिक कार्याला अधिक व्यापक दिशा मिळावी, अशा सदिच्छा अंबाजोगाईकरांकडून व्यक्त होत आहेत.
अमर भैय्या देशमुख यांच्या निवडीबद्दल राजकीय, सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


