अंबाजोगाईत १३ डिसेंबर रोजी कृत्रिम हात व पाय मोफत वाटप शिबिर रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा संयुक्त उपक्रम
अंबाजोगाईत १३ डिसेंबर रोजी कृत्रिम हात व पाय मोफत वाटप शिबिर
रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा संयुक्त उपक्रम
अंबाजोगाई : गरजू आणि दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगता यावे, या सामाजिक भावनेतून रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई येथे कृत्रिम हात व पाय मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये गरजू व्यक्तींना एल.एन. ४ प्रोस्थेटिक हात तसेच जयपूर फूट उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांच्या हाताचे व पायाचे मोजमाप शिबिरादरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे कृत्रिम हात किंवा पायाची आवश्यकता असलेल्या व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे शिबिर अंबाजोगाई नगर परिषदेजवळील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह येथे होणार आहे. गरजू लाभार्थ्यांनी नावनोंदणीसाठी प्रोजेक्ट चेअरमन रो. स्वप्निल परदेशी (मो. ९९२१८३४२४६), रो. गणेश राऊत (मो. ९६५७०४१७०१) आणि रो. बालाजी घाडगे (मो. ९९७०९४८५४४) यांच्याशी संपर्क साधावा.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष रो. शकील शेख, सचिव रो. राधेश्याम लोहिया, क्लब ट्रेनर रो. संतोष मोहिते आणि जिल्हा समन्वयक रो. मेघराज बरबडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
गरजू व्यक्तींना पुन्हा आत्मविश्वासाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरणार असून, पात्र लाभार्थ्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.


