Skip to content
आषाढी एकादशीनिमित्त ‘ज्ञान–अध्यात्म–पर्यावरण दिंडी’ने अनुभवला भक्ती, संस्कार आणि पर्यावरण जागृतीचा संगम

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एम.आय.टी. शालेय विभाग, कै. दादाराव कराड विद्यालय, अंबाजोगाई येथे आषाढी एकादशीनिमित्त ‘ज्ञान–अध्यात्म–पर्यावरण दिंडी’ तसेच विविध भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. भक्ती, संस्कार, भारतीय संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल–रुक्मिणी प्रतिमा पूजन व आरतीने झाली. त्यानंतर विद्यार्थी रोनक पोखरकर यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची गौरवशाली परंपरा आणि संतांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व यावर ओजस्वी भाषण करून उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.
विद्यार्थी वेदांत घुगे व तुकाराम घुगे यांनी “उभा कसा राहिला विटेवरी” हा अभंग अत्यंत सुरेल स्वरात सादर करत संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. यानंतर विद्यार्थ्यांनी काढलेल्या ज्ञान–अध्यात्म–पर्यावरण दिंडीने संत साहित्य, भारतीय संस्कृती, स्वच्छता, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. टाळ-मृदुंगाच्या निनादात घुमणारे “ज्ञानबा-तुकाराम” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” हे जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय चैतन्याने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या संत वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई आदी संतांची प्रभावी रूपे साकारून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा जिवंत परिचय घडविला. त्यांच्या अभिनयाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यानंतर पूर्वा भोळे, अवनी पतंगे आणि सुप्रिया केंद्रे यांनी “विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा” हा अभंग भावपूर्ण शैलीत सादर केला. ठाकर सर आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भारूड व अभंगातून संत परंपरेतील समाजप्रबोधनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. तसेच पाऊली आणि फुगडी नृत्यांनी वारकरी संप्रदायातील भक्ती, उत्साह, समता आणि सामूहिक एकात्मतेचे लोभसवाणे दर्शन घडविले.

समारोपप्रसंगी मा.प्राचार्य रामराजे कराड यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विशद करत संतांचे विचार आचरणात आणण्याचे, निसर्गसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आणि पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. अदिती दराडे व कु. रुपाली घोळवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
Post Views: 55
error: Content is protected !!