Skip to content
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारूमाफियाला दणका!
एमपीडीएअंतर्गत कारवाई; किशोर जाधवची हर्सूल कारागृहात रवानगी

अंबाजोगाई : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व्यवसायाविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चनई (ता. अंबाजोगाई) येथील किशोर बाबराव जाधव (वय ३९) याच्यावर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली आहे.
अंबाजोगाई शहर पोलिसांनी जाधव याच्याविरुद्ध बुटलेगर या सदराखाली एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक, बीड यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. या प्रस्तावास ११ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मंजुरी दिली. त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेऊन हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले.
जाधव याच्याविरुद्ध हातभट्टीची दारू तयार करणे, ताब्यात बाळगणे, वाहतूक व विक्री यासंदर्भात महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियमांतर्गत सहा गुन्हे दाखल आहेत. तसेच १६ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्यावर कलम ९३ म.दा.का. अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या कारवायांमध्ये सुधारणा झाली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
समाजकंटकांवर कठोर कारवाईचे संकेत
यापुढेही अवैध वाळू व्यापार, गुटखा विक्री, हातभट्टीची दारू, बेकायदेशीर जुगार व लॉटरी, तसेच जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि खंडणी व दादागिरी करणाऱ्या धोकादायक गुंडांविरुद्ध एमपीडीए व मोक्का (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिला आहे.
Post Views: 102
error: Content is protected !!