*अंबाजोगाई पिपल्सला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार – चेअरमन राजकिशोर मोदी*
*अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा*
*अंबाजोगाई पिपल्सला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार – चेअरमन राजकिशोर मोदी*

*उत्कृष्ट ग्राहकांसह गुणवंतांचा सन्मान, प्रशिक्षण व जनजागृतीपर मार्गदर्शन*

====================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेने सन २०२५-२०२६ मधील केलेल्या उत्तम कामकाजामुळे ३१ मार्च २०२६ अखेर बँकेने ६६५ कोटींच्या ठेवी जमवत शुन्य नेट एनपीए राखण्यात यश मिळवले आहे. त्याबरोबर बँकेस ५ कोटी २६ लक्ष रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. त्यामुळे ९ टक्के एवढा लाभांश जाहीर करून पुढील काही वर्षांत अंबाजोगाई पिपल्सला शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले. ते अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी उत्कृष्ट ग्राहकांसह गुणवंतांचा सन्मान करण्यात आला, तर तज्ज्ञांकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व सभासद ग्राहकांना जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले.
अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार, दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन राजकिशोर मोदी तर व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा.वसंतराव चव्हाण, ऍड.विष्णुपंत सोळंके, पुरूषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ऍड.सुधाकर कराड, संकेत मोदी, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, सौ.नेहा हिवरेकर, सुनिल राजपुरोहित, सी.ए.सचिन बेंबडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना चेअरमन राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, बँकेने मिळविलेले आजचे हे यश दिवंगत लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, दिवंगत लोकनेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दिवंगत लोकनेते माजी आमदार बाबुरावजी आडसकर तसेच माजी कृषिमंत्री आ. धनंजयजी मुंडे साहेब, माजी आमदार अमरसिंहजी पंडित साहेब यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, मोलाची मदत व सहकार्य लाभले आहे. या सोबतच बँकेचे सर्व सन्माननीय संचालक, ठेवीदार, कर्जदार, भागधारक, ग्राहक, हितचिंतक तसेच सभासदांच्या सातत्यपूर्ण विश्वास व सहकार्याच्या भावनेमुळेच शक्य झाले असल्याचे देखील ते म्हणाले. मार्च २०२६ अखेर बँकेची एकूण सभासद संख्या १३,१५८ एवढी असून त्याच्या बळावरच बँकेच्या सभासद तथा ग्राहक बांधवांना मार्च २०२६ अखेर रू.३६९ कोटी इतके कर्जवाटप केले आहे. या आर्थिक वर्षाचे भाग भांडवल रू.२२ कोटी एवढे असून बँकेचा स्वनिधी रू.५४ कोटी एवढा आहे. त्याच बरोबर वर्ष अखेरीस बँकेने एकूण रू.३५० कोटी एवढी गुंतवणूक केली आहे. ३१ मार्च २०२६ अखेर बँकेने एकूण ठेवी रू.६६५ कोटी इतक्या जमा केलेल्या आहेत. सर्व ठेवीना विमा संरक्षण आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३० कोटी रूपयांची व्यवसायात वाढ झाली आहे. स्थापनेपासून बँकेने लेखा परिक्षण वर्ग-अ कायम राखला आहे. तर अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेने मार्च २०२६ अखेर तब्बल ११०० कोटींचा एकूण बँकिंग व्यवसाय केला असून शुन्य टक्के नेट एनपीए राखण्यात बँकेस यश आले आहे, तर बँकेने ३१ मार्च २०२६ अखेर ५ कोटी २६ लक्ष रूपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. आपली बॅंक ही सभासदांना सातत्याने लाभांश देणारी बॅंक आहे. त्यामुळे यावेळेस ही सभासदांना ९ टक्के एवढा लाभांश जाहीर करीत आहोत. गतवर्षी बँकेस २ राष्ट्रीय व २ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सर्व क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती पाहता उत्तम टीमवर्क व सांधिक कामगिरीमुळे बँकेस हे प्रगतीचे उद्दीष्ट साध्य करता आले असल्याचे बँकेचे संस्थापक राजकिशोर मोदी यांनी नमूद करून पुढील काळात कमी व्याजदरात वाहन, व्यवसाय, गृह कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. बँकेकडे सर्व अद्ययावत तंत्रज्ञान आहे, यामुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा व सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरबीआयकडून नविन शाखांना मंजुरी मिळून त्या कार्यरत झाल्या आहेत. ५ लाखांपर्यंतच्या सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे. बँकेची नवीन शाखा व मुख्यालय इमारतीचे गुणवत्तापूर्ण बांधकाम सुरू आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत गुणवंतांचा सत्कार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना उत्कृष्ट ग्राहक सन्मानाने पुरस्कारीत केले आहे. मार्च २०२६ अखेरील बँकेची प्रगती ही बँकेच्या पुढील वाटचालीस नवीन उभारी देणारी असून बँकेच्या सभासद, कर्जदार, ठेवीदार व ग्राहकांनी बँकेवरील विश्वास कायम ठेवल्याची पावती असल्याचे देखील मोदी यांनी नमूद केले आहे. चालू आर्थिक वर्षात अनंत अडचणी येऊनही बँकेच्या वसुली विभागाने समाधानकारक काम करीत बँकेचा निव्वळ एनपीए शुन्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. देशातील सद्य आर्थिक परिस्थितीत देखील कर्जधारक, ग्राहकांचा विचार करून बँकेने सुरळीत व पारदर्शक आर्थिक व्यवहार करीत बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक ठेवण्यास यश मिळवले आहे असे मत बँकेचे संस्थापक अध्यक्ष मोदी यांनी व्यक्त केले. बँकेचे सर्व सभासद, ग्राहक यांचा विश्वास, बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन व बँकेच्या अधिकारी व कर्मचारीवृंदांचे नियोजनबध्द कामकाज यामुळे सन २०२५-२०२६ मध्ये चांगले कामकाज करणे शक्य झाले आहे. अशीच कामगिरी पुढील आर्थिक वर्षातही कायम ठेवण्याचा बँकेचा प्रयत असेल अशी ग्वाही यावेळी बँकेचे अध्यक्ष मोदी यांनी दिली आहे. १९९६ साली केवळ एका शाखेद्वारे अतिशय अल्प अशा भांडवलावर सुरू झालेली अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक आज ६६५ कोटी ठेवींच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या १७ जिल्ह्यांत २१ कार्यरत शाखा व २ विस्तारित कक्ष अशा एकूण २३ शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना तत्पर व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांच्या आधीन राहूनच अंबाजोगाई पिपल्स बॅंक आजपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार करीत आहे असे मोदी यांनी नमूद केले. अंबाजोगाई पिपल्स बॅंक अर्थकारण करीत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. ज्यामध्ये शहरातील गुणिजनांचा सन्मान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण याबरोबरच महिलांसाठी बॅंकिंग प्रशिक्षण शिबिर, विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात बॅंक अग्रस्थानी असते. या व अशा इतर अनेक कारणांमुळे अंबाजोगाई पिपल्स बॅंक ग्राहकांच्या प्रथम पसंतीस उतरली असल्याचे समाधान बँकेचे अध्यक्ष मोदी यांनी व्यक्त केले आहे. यापुढेही बँकेचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी वृंद, पिग्मी एजंट यांच्या सहकार्याने अर्थकारणा सोबतच वारंवार असेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतील असा संकल्प बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी जाहीर केला. सभेची सुरूवात नुकतेच मंगळवार पेठ, हमाल गल्ली भागातील मयत कामगार बबन वाघमारे, खंडू वाघमारे यांच्यासह गत आर्थिक वर्षांतील सर्व क्षेत्रातील दिवंगतांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी ग्रामदैवत श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचेपूजन व दीपप्रज्ज्वलन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे, अंतर्गत बीड जिल्ह्याचे सहकार विकास अधिकारी आर.डी.वाघमारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर उत्कृष्ट ग्राहक म्हणून आनंदा सूर्यवंशी (शाखा-सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), सचिन जगताप (शाखा-बीड), प्रितेश धानुका (शाखा- सिडको, छत्रपती संभाजीनगर), सय्यद सलीम सय्यद अब्दुल रहेमान (शाखा-अंबाजोगाई), मोहसीन शेख (शाखा-जोगाईवाडी) यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे कर्ज वसुली अधिकारी भानुदास गावडे यांचे सुपुत्र सारंग याने नीट परीक्षेत ७२० पैकी ६३०, जेईई परीक्षेत ९९.१४ टक्के गुण प्राप्त केले. एमएचसीईटी मध्ये ९८.५८ टक्के गुण प्राप्त करून तो एकाच वेळी आयआयटी व एमबीबीएससाठी पात्र ठरला. उत्तरप्रदेश मध्ये रायबरेली एम्स येथे वैद्यकीय प्रवेश निश्चित झाल्याबद्दल सारंग भानुदास गावडे याचा आई-वडिलांसह गुणगौरव करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट ग्राहक आनंदा सूर्यवंशी यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. तर महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे, अंतर्गत बीड जिल्ह्याचे सहकार विकास अधिकारी आर.डी.वाघमारे यांनी, ‘सभासदांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या’ या विषयावर प्रशिक्षण दिले. तर बँकेचे संचालक संदेश बोराडे यांनी, ‘सायबर सिक्युरिटी व अवेअरनेस’ या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. तसेच ताळेबंद, नफातोटा पत्रकाचे वाचन चेअरमन मोदी यांनी केले. तर विषय वाचन संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी केले. विषयपत्रिकेनुसार सभेची सुरूवात झाली. सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषय आणि ठराव उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. सभेचे सुत्रसंचालन बॅंकेचे सभासद आनंद टाकळकर यांनी केले. तर उपस्थित सर्वांचे आभार बॅंकेचे संचालक सी.ए.सचिन बेंबडे यांनी मानले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँकेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
====================
====================


