Wednesday, November 11, 2026
Latest:
ताज्या घडामोडी

*अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नासाठी डॉ. आदित्य पतकराव यांचा पुढाकार! २६ नोव्हेंबरच्या बैठकीत नवीन रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मांडणार* *घाटनांदूर-श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्याची मागणी; पर्यायी रेल्वे मार्गाचाही पर्याय! यापूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही पाठपुरावा.*

*अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नासाठी डॉ. आदित्य पतकराव यांचा पुढाकार! २६ नोव्हेंबरच्या बैठकीत नवीन रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मांडणार*

*घाटनांदूर-श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्याची मागणी; पर्यायी रेल्वे मार्गाचाही पर्याय! यापूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही पाठपुरावा.*

*अंबाजोगाई | प्रतिनिधी*

अंबाजोगाई शहर आणि परिसरातील नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता ठोस पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य *डॉ. आदित्य दगडू पतकराव* हे येत्या २६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणाऱ्या रेल्वेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंबाजोगाई येथे नवीन रेल्वे स्टेशन सुरू करण्याचा अधिकृत प्रस्ताव मांडणार आहेत.

अंबाजोगाईला रेल्वेच्या नकाशावर स्थान मिळावे, यासाठी डॉ. पतकराव दोन महत्त्वाचे पर्याय रेल्वे प्रशासनासमोर मांडणार आहेत. यामध्ये २०१६ मध्ये मंजूर झालेला घाटनांदूर-श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षण प्रकल्प पुन्हा सुरू करावा, तसेच या प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. हा मार्ग शक्य नसल्यास अंबाजोगाईला जोडणारा पर्यायी रेल्वे मार्ग निश्चित करून शहरात नवीन रेल्वे स्टेशन सुरू करण्यात यावे, अशी आग्रही भूमिका ते मांडणार आहेत.

*केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवला अंबाजोगाईचा रेल्वे प्रश्न!*

विशेष म्हणजे, डॉ. आदित्य पतकराव यांनी अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नासाठी यापूर्वीही रेल्वे मंत्रालयाच्या पातळीवर पाठपुरावा केला आहे. दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याकडे अंबाजोगाई येथे नवीन रेल्वे स्टेशन सुरू करण्याची मागणी केली होती.

तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही डॉ. पतकराव यांनी यापूर्वी अंबाजोगाईच्या नवीन रेल्वे स्टेशनसंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे ही मागणी केवळ एका बैठकीपुरती मर्यादित नसून, रेल्वे मंत्रालयाच्या स्तरावरही यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट होते.

*२६ नोव्हेंबरच्या बैठकीत अधिकृत प्रस्ताव!*

मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाकडून डॉ. आदित्य पतकराव यांना २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण प्राप्त झाले आहे. पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे.

बैठकीच्या निमंत्रण पत्रामध्ये समिती सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात नवीन रेल्वे स्टेशन सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. या संधीचा उपयोग करून अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नाला अधिकृत व्यासपीठावर मांडण्यात येणार आहे.

*बीड जिल्ह्यातील रेल्वे विकासाचा लाभ अंबाजोगाईलाही मिळावा!*

नुकतेच बीड येथे रेल्वे स्टेशन कार्यान्वित झाले असून बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानके मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या कार्यक्षेत्रात येतात. अंबाजोगाई हे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी केंद्र असल्यामुळे या शहराला रेल्वेने जोडण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी भूमिका डॉ. पतकराव मांडणार आहेत.

*अंबाजोगाईला रेल्वे मिळाल्यास विकासाला मोठी चालना!*

अंबाजोगाई हे मराठवाड्यातील महत्त्वाचे धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यापारी केंद्र आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, योगेश्वरी मंदिर, विविध शैक्षणिक संस्था आणि आरोग्यसेवांमुळे राज्याच्या विविध भागांतून नागरिक अंबाजोगाईत येत असतात. मात्र, थेट रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

अंबाजोगाईला रेल्वेने जोडल्यास बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या दळणवळण, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते.

*“अंबाजोगाईला रेल्वे स्टेशन मिळणे ही केवळ एका शहराची मागणी नसून संपूर्ण परिसराच्या विकासाची गरज आहे. यासाठी यापूर्वीही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडले आहेत. आता २६ नोव्हेंबरच्या बैठकीत २०१६ मध्ये मंजूर झालेला घाटनांदूर-श्रीगोंदा रेल्वे सर्वेक्षण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची किंवा पर्यायी रेल्वे मार्ग निश्चित करून अंबाजोगाई येथे नवीन रेल्वे स्टेशन सुरू करण्याची मागणी अधिकृतपणे मांडणार आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, ही अपेक्षा आहे,”* असे डॉ. आदित्य पतकराव यांनी सांगितले.

आता २६ नोव्हेंबरच्या बैठकीत अंबाजोगाईच्या रेल्वे प्रश्नावर काय चर्चा होते आणि रेल्वे प्रशासन या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

*अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अंबाजोगाईच्या रेल्वे स्वप्नाला आता मंत्रालयीन पाठपुराव्याची आणि अधिकृत प्रस्तावाची जोड मिळाली आहे. अंबाजोगाईला रेल्वे स्टेशन मिळणार का, याची उत्सुकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे!*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!