ताज्या घडामोडी

*बीड येथील मुस्लीम आरक्षण मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांचा जाहीर पाठिंबा*

*बीड येथील मुस्लीम आरक्षण मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी यांचा जाहीर पाठिंबा*

अंबाजोगाई: महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी ही अत्यंत न्याय्य असून, या मागणीसाठी येत्या शुक्रवारी, १७ एप्रिल २०२६ रोजी बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘मुस्लिम आरक्षण मोर्चा’ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. या संदर्भात त्यांनी ‘सकल मुस्लिम आरक्षण कृती समिती’ला अधिकृत पत्र पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राजकिशोर मोदी म्हणाले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आणि घटकाला समान संधी तसेच सामाजिक न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे. मुस्लिम समाज हा आजही शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडलेला असून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हा एक अनिवार्य उपाय आहे. शिक्षण, रोजगार आणि शासन व्यवस्थेत या समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळणे ही सामाजिक समतेच्या दृष्टीने काळाची गरज आहे.

मोदी यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे की, यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने मुस्लिम समाजाच्या हितासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला होता. भविष्यातही आम्ही आरक्षणाच्या या मागणीशी ठाम राहू. हा लढा केवळ एका समाजाचा नसून तो सामाजिक न्याय आणि हक्कांचा बुलंद आवाज आहे. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने निघणारा हा मोर्चा शासनाचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होईल आणि मुस्लिम समाजाच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला पाठबळ देणार आहेत. मुस्लिम समाजाच्या या घटनात्मक लढ्यात आम्ही खंबीरपणे सोबत उभे असल्याची ग्वाही राजकिशोर मोदी यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!