अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या पुढाकारातून धायगुडा-पिंपळ्यात ऐतिहासिक ऐक्य; सिया-सुन्नी मुस्लिम बांधवांची प्रथमच एकत्रित बकरी ईद नमाज
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या पुढाकारातून धायगुडा-पिंपळ्यात ऐतिहासिक ऐक्य; सिया-सुन्नी मुस्लिम बांधवांची प्रथमच एकत्रित बकरी ईद नमाज

अंबाजोगाई | प्रतिनिधी
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सकारात्मक पुढाकारातून तालुक्यातील धायगुडा-पिंपळा येथे सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश देणारी घटना घडली. अनेक वर्षांपासून स्वतंत्रपणे नमाज अदा करण्याची परंपरा बाजूला ठेवत सिया व सुन्नी मुस्लिम बांधवांनी प्रथमच एकत्रित येऊन बकरी ईदची नमाज शांततेत, उत्साहात आणि बंधुभावाच्या वातावरणात अदा केली.
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल १३ ठिकाणी बकरी ईद साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या वतीने विविध गावांमध्ये शांतता समितीच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकींना मौलवी, इमाम, मौलाना तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः घाटनांदुर आणि धायगुडा-पिंपळा येथे स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या.
धायगुडा-पिंपळा येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवण्यासाठी एकत्रित नमाज अदा करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्वांनी एकमताने पुढील काळात रमजान ईद व बकरी ईद या दोन्ही सणांच्या नमाज एकत्रितपणे अदा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
या निर्णयाची अंमलबजावणी यंदाच्या बकरी ईदपासूनच करण्यात आली असून, अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात नमाज संपन्न झाली. या प्रसंगी पोलीस बिट अंमलदार बासर, डीएसबीचे विवेक सोळंके, रायटर कल्याण देशमाने यांची उपस्थिती होती.
बकरी ईदचा सण निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या या पुढाकारामुळे परिसरात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि शांततेचा प्रेरणादायी संदेश पोहोचला आहे.

