ताज्या घडामोडी

*S.I.R २०२६ मतदार नोंदणीतील ‘Anomaly’ ची समस्या तात्काळ सोडवा! पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत प्रशासनाला निवेदन.*

*S.I.R २०२६ मतदार नोंदणीतील ‘Anomaly’ ची समस्या तात्काळ सोडवा! पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाईत प्रशासनाला निवेदन.*

अंबाजोगाई प्रतिनिधी:

महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाच्या वतीने सध्या अंबाजोगाई शहरात अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘S.I.R २०२६’ प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेमध्ये सध्या स्थानिक नागरिकांना ऑनलाईन कामे करताना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, अंबाजोगाई शहराचे पूर्व उपनगराध्यक्ष आदरणीय शेख रहीम साहेब यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आज अंबाजोगाईचे तहसीलदार मा. विलास तरंगे साहेब यांना नागरिकांच्या वतीने एक सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विलास तरंगे साहेब यांच्यासोबत या गंभीर विषयावर विस्तारपूर्वक चर्चा केली. सध्या ऑनलाईन प्रक्रियेत उद्भवत असलेल्या तांत्रिक दोषांमुळे अनेक नागरिक त्रस्त असून, यामुळे एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने लावून धरली. नागरिकांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर, तहसीलदार विलास तरंगे साहेब यांनी प्रशासकीय पातळीवर सर्व तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील आणि आगामी काळात सर्व नागरिकांना दिलासा दिला जाईल, असे ठोस आश्वासन दिले.
या निवेदनात प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या तांत्रिक मागण्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पहिल्या मुद्यात, मतदारांचे ऑनलाईन फॉर्म भरताना सिस्टीममध्ये ‘Anomaly’ (त्रुटी) अशी अडचण दर्शवली जात असून तिचे वरिष्ठ पातळीवरून त्वरित निवारण करण्यात यावे, अशी मुख्य मागणी करण्यात आली. दुसऱ्या मुद्यात, अनेक मतदारांची नावे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक सध्याच्या यादीत दिसून येत नसल्याने ते पुन्हा अद्ययावत करण्याची विनंती करण्यात आली. तसेच, शहरातील काही प्रभागांमध्ये तांत्रिक कारणांमुळे अद्यापही काही नागरिकांचे भाग निश्चितीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही, ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना आवश्यक साहाय्य देऊन प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.


हे महत्त्वपूर्ण निवेदन सादर करताना पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम साहेब यांच्यासोबत Advocate प्रदीप पुरुषोत्तम दहिवाळ, शेख हारून, प्रसिद्ध समाजसेवक शेख मोहसिन, सय्यद दानिश,इझहार शेख, सय्यद आफताब, सय्यद साजेद, पत्रकार फिरोज यांच्यासह शहरातील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!